Site icon

कमला एकादशीचे महत्व

कमला एकादशीचे महत्व

 

तीन वर्षातून एकदाचं येते ‘कमला एकादशी’ जाणून घ्या व्रत आणि पूजा विधी.

२९/०७/२०२३- (पद्मिनी) कमला एकादशी

हिंदू धर्मामध्ये तसेच वारकरी संप्रादयामध्ये एकादशी तिथी विशेष मानली जाते.मात्र अधिक मासातील एकादशीचे महत्त्व अधिक मानले गेले आहे.

अधिक मासातील दोन्ही पक्षातील एकादशीला कमला एकादशी म्हटले जाते.या दिवशी भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी एकादशीचे व्रत आणि पूजा केली जाते.

कमला एकादशी व्रत आणि पूजा विधी

एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून नदी किंवा तलावावर जाऊन शेण, माती, तीळ, कुश आणि आवळ्याच्या चूर्णाने स्नान करावे.त्यानंतर मंदिरात जाऊन भगवान श्रीकृष्णाची धूप-दीप, नैवेद्य, फुल, केशर अर्पण करून पूजा करावी. या दिवशी पाणी न पिता व्रत ठेवावे. परंतु, तुम्हाला शक्य नसल्यास केवळ पाणी पिऊन किंवा फळ खाऊन हे व्रत करावे.

या दिवशी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत प्रत्येक ३ तासांनी भगवान विष्णू- लक्ष्मी आणि महादेव- पार्वतीची पूजा करावी. याशिवाय या दिवशी देवाला नारळ, बेलाचे फळ, सीताफळ आणि सुपारी अर्पण करावी.. शक्य असल्यास रात्रभर जप करावा.

दरम्यान, द्वादशीला सकाळी लवकर उठून स्नान करावे.कमला एकादशीचे व्रत केल्याने भगवान विष्णूचा आशीर्वादाचा लाभ मिळतो, असं म्हटलं जातं. पुरुषोत्तम एकादशीचे व्रत करणाऱ्यांना हजार यज्ञाचे पुण्य प्राप्त होते, असं पौराणिक कथेत म्हटलं आहे. याशिवाय हे व्रत केल्याने मोक्षप्राप्ती होते

 

एकादशी दिवशी करायची सेवा

१)विष्णुसहस्त्रनाम स्तोत्र एकादशी ची सेवा म्हणून अवश्य पठण करावे.

२) एकादशी सेवा म्हणून पितृदोष निरसन व्हावे म्हणून 700 श्लोकी श्रीमद भागवत या ग्रंथाचे एक पारायण अवश्य करावे .

पितरांना मुक्ती मिळण्यासाठी श्री सुलभ भागवत ग्रंथ पारायण करताना “ॐ नमो भगवते वासुदेवाय” या मंत्राचे संपुट किंवा पल्लव लावून पारायण केल्यास जन्म-जन्मांतरीचे दोष नाहीसे होतात तसेच पितरांचे आशीर्वाद मिळून हाती घेतलेल्या सर्व कार्यात यश मिळते.

*दर महिन्याच्या प्रत्येक एकादशीला संक्षिप्त भागवत वाचन आणि जोडीला पंच महायज्ञ असू द्या.तुम्हाला नारायण नागबली तथा मातृगया सारखे विधी करण्याची आवश्यकता भासणार नाही

स्त्रियांचे सासर आणि माहेर अशा दोन्ही घराण्याचे दोष घालवण्याचे सामर्थ्य भागवत ग्रंथात आहे.

३) एकादशी दिवशी प्रत्येकाने दिवसभरात श्री पांडुरंग मंत्र किमान १ माळ जप करावा
‘श्री वत्सं धारयन्। वक्षे मुक्ता माला षडाक्षरं॥

श्री स्वामी समर्थ

 ज्ञानेश्वरी का वाचावी ?

 

1) सूर्य स्थिर आहे आणि पृथ्वी सूर्याभोवती फिरते हा शोध कोपर्निकसने लावला.

माऊलीं ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये 725 वर्षापूर्वीच सूर्याचे भ्रमण हा भास आहे, हे वैज्ञानिक सत्य मांडले होते.

उदय-अस्ताचे प्रमाणे |
जैसे न चालता सूर्याचे चालणे |
तैसे नैष्कर्म्यत्व जाणे |
कर्मींचि असता ||

सूर्य चालत नसून चालल्यासारखा दिसतो. सूर्याचे न चालता चालणे हा ज्ञानेश्वरीतील क्रांतीकारक शोध आहे.

2) मानवी जन्माची प्रक्रिया कसल्याही उपकरणाची मदत न घेता ज्ञानेश्वर महाराज जेव्हा सांगतात तेव्हा नामांकित डॉक्टरांनाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहात नाही. माऊली लिहितात,

शुक्र-शोणिताचा सांधा |
मिळता पाचांचा बांधा |
वायुतत्व दशधा |
एकचि झाले ||

शुक्र जंतू पुरुषाच्या वीर्यामध्ये असतात व शोणित पेशी स्त्रियांच्या बिजांड कोषात असतात. या शोणित पेशी अतिसूक्ष्मदर्शक यंत्राशिवाय दिसत नाहीत.

सूक्ष्मदर्शक यंत्राचा शोध चारशे वर्षांतील आहे. परंतु माऊलींनी कसल्याही सूक्ष्मदर्शकाच्या मदती-शिवाय शोणित पेशींचा उल्लेख केला आहे. इथे त्यांच्यातील सर्वज्ञता दिसते.

3) पृथ्वी सपाट आहे की गोल या प्रश्नावर शास्त्रज्ञांत बराच काळ वाद चालला होता. पृथ्वी गोल आहे हा सिद्धांत आता जगन्मान्य झाला आहे.

माऊली ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये 725 वर्षापूर्वीच पृथ्वी गोल असल्याचे सांगितले.

पृथ्वीये परमाणूंचा उगाणा घ्यावा |
तरी हा भूगोलचि काखे सुवावा |
तैसा विस्तारू माझा पाहावा |
तरी जाणावे माते ||

भूगोल हा शब्दच ज्ञानेश्वरीने मराठीला दिला आहे. आणि पृथ्वी गोल असल्याचे निःसंदिग्ध सांगताना परमाणूचाही (Micro-Electron) स्पष्ट उल्लेख केलाय.

4) पाण्याच्या घर्षणातून जलविद्युत निर्माण होते. हा विजेचा शोधही शे दिडशे वर्षांपूर्वीचा आहे असे आपण मानतो.

परंतु माऊली ज्ञानोबाराय 725 वर्षांपूर्वीच सांगतात की, पाण्याचे जोरात घर्षण झाले की वीज तयार होते.

तया उदकाचेनि आवेशे |
प्रगटले तेज लखलखीत दिसे |
मग तया विजेमाजी असे | सलील कायी ||

5) सागराच्या पाण्याची वाफ होते, त्याचे ढग बनतात व त्याला थंड हवा लागली की पाऊस पडतो. ही पाऊस पडण्याची प्रक्रिया विज्ञानाने अलिकडे शोधून काढली आहे. परंतु माऊली ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीमध्ये लिहितात की, सुर्याच्या प्रखर उष्णतेने मी परमात्माच पाणी शोषून घेतो व त्या वाफेचे ढगात रूपांतर करतो व इंद्रदेवतेच्या रूपाने पाऊस पाडतो. हे पावसाचे शास्त्रशुद्ध तंत्र सांगणारी ओवी अशी,

मी सूर्याचेनि वेषे |
तपे तै हे शोषे |
पाठी इंद्र होवोनि वर्षे |
मग पुढती भरे ||

6) विज्ञानाला सूर्यमालेतील ग्रहांचा शोध लागला आहे.

या विश्वाच्या पोकळीतील फक्त एकच सूर्यमाला मानवी बुद्धीला सापडली. अशा अनेक सूर्यमाला या पोकळीत अस्तित्वात आहेत. विश्वाला अनंत हे विशेषण लावले जाते. या विश्वात अनंत ब्रम्हांडे आहेत म्हणून भगवान अनंतकोटी ब्रहांडनायक ठरतात. परंतु माऊलीं ज्ञानोबारायांनी 725 वर्षापूर्वीच सूर्यमालेतील मंगळ या ग्रहाबद्दल लिहिले आहे. विज्ञानाने शोध लावण्यापूर्वीच माऊली मंगळाचे

अस्तित्व सांगतात,
ना तरी भौमा नाम मंगळ |
रोहिणीते म्हणती जळ |
तैसा सुखप्रवाद बरळ | विषयांचा ||
किंवा
“जिये मंगळाचिये अंकुरी |
सवेचि अमंगळाची पडे पारी |
किंवा
ग्रहांमध्ये इंगळ |
तयाते म्हणति मंगळ |
इतकेच नव्हे, तर नक्षत्रांचेही उल्लेख आहेत. रोहिणीचा वरच्या ओवीत आलाय, तसेच मूळ नक्षत्र:
परी जळो ते मूळ-नक्षत्री जैसे |
किंवा
स्वाती नक्षत्र:
स्वातीचेनि पाणिये |
होती जरी मोतिये |
तरी अंगी सुंदराचिये |
का शोभति तिये ||

कॅमेरा आणि पडद्यावर दिसणारा चित्रपट यांचे मूळही ज्ञानेश्वरीत सापडते

जेथ हे संसारचित्र उमटे |
तो मनरूप पटु फाटे |
जैसे सरोवर आटे |
मग प्रतिमा नाही ||

अर्थात संकल्प-विकल्पांमुळे मनाचे चित्र उमटवणारे पटल किंवा पडदा फाटून जातो. चित्रपटासाठी पडदा आवश्यक आहेच किंवा सरोवरात पाणी असेल तरच आपली प्रतिमा त्यामध्ये उमटते. ते आटून गेले तर उमटत नाही.

या सर्व ओव्यांचा आशय लक्षात घेतला तर ज्ञानेश्वरीची वैज्ञानिकता ध्यानात येईल.
विज्ञानयुगात दिशाभुल झालेल्या युवक-युवतींनी ज्ञानेश्वरीची ही शास्त्रीयता लक्षात घेऊन मानवी जीवनाचे यथार्थ दर्शन घडविण्या-या संत वाड़मयाच्या सहवासात यावे.
म्हणूनच वाचावी ज्ञानेश्वरी.

 

देवासमोर दिवा

देवासमोर दिवा का लावावा . त्यात आपण तेल तूप एकत्र घालावं कि नाही हे सगळी माहिती सांगणार आहे.

 

कोणत्याही पूजेची सुरुवात करण्यापूर्वीच सुरुवातीला एका बाजूला दिवा लावला जातो. पूजा करण्याचा घेतलेला संकल्प पूर्ण होईपर्यंत तेवत राहण्याचे, स्थिर राहण्याचे आवाहन अग्नी देवतेला केले जाते. यानंतर पूजा झाल्यानंतरही देवासमोर दिवा लावला जातो.
आरती करतांना नीरांजनात फ़ुलवात किंवा वात लावून ते देवाच्या तोंडापासून पायापर्यंत ओवाळावे. वात पांढर्या स्वच्छ कापसाची असावी. ती तेलात भिजवू नये. शक्यतोपर्यंत तुपात भिजवावी. निरांनजासारख्या पात्रात दीप लावून तो ओवाळून झाल्यावर समईसारख्या उंच पात्रात ठेवण्याची व्यवस्था असावी. देवाच्या तोंडावर उजेड पडेल अशा ठिकाणी दीप ठेवावा. देवावर अंधार पडेल अशा ठिकाणी दीप ठेवू नये.
दीप लावताना दीपाने दीप लावू नये. काडीने दीप लावावा. दिव्याने दीप लावल्याने आणि विझल्यावर अर्धवट जळकट वातीची घाण सुटल्याने रोग व दारिद्र्य प्राप्त होते. जमिनीवर वात केव्हाही लावू नये. नीरांजनातून वात काढून ठेवू नये. अनेक वाती लावणे असल्यास विषम प्रमाणात म्हणजे १-३-५-७ अशा लावाव्यात. दीप लावताना त्यात वातीशिवाय थोडे तेल किंवा तेल घालावे.
तुळशीपाशी दिवा लावण्यापूर्वी अक्षतांचे आसन अर्थात दिव्याखाली अक्षता ठेवाव्या. त्यावर आपल्या इच्छेनुसार तेल किंवा तुपाचा दिवा लावावा. देवी लक्ष्मी अक्षतांचे आसन ग्रहण करते असे मानले आहे म्हणून अक्षता ठेवल्याने देवी विराजमान होते.
निरंजनात तुप व तेल कधीही एकत्र घालू नये कारण तूप हे सत्व तत्व व निर्गुण आहे व तेल हे रज तत्व व सगुण आहे . म्हणून हे दोन्ही एकत्र करता येत नाही . नाहीतर तम तत्व वाढेल .
द्यावी.आरती म्हणत असताना देवाला ओवाळताना तबक देवाभोवती घड्याळाच्या काट्यांच्या दिशेने पूर्ण वर्तुळाकृती फिरवावे.आरती ओवाळताना ती देवाच्या डोक्यावरून ओवाळू नये.आरती झाल्यानंतर ‘घालीन लोटांगण.’ ही प्रार्थना म्हणावी.यानंतर ‘कर्पूरगौरं करुणावतारं’ हा मंत्र म्हणत कापूर-आरती करावी. कापूर-आरती ग्रहण करावी, म्हणजे ज्योतीवर दोन्ही हातांचे तळवे धरून मग उजवा हात डोक्यावरून पुढून पाठी मानेपर्यंत फिरवावा. काही कारणास्तव कापूर-आरती केली नसल्यास तुपाच्या निरांजनाच्या ज्योतीवर हात धरून आरती ग्रहण करावी. देवाला शरणागत भावाने नमस्कार करावा.
देवासमोर दिवा लावल्याने लक्ष्मी प्रसन्न होते आणि तिथे स्थिर होते, अशी मान्यता आहे. शुद्ध तुपाचा दिवा लावणे अत्यंत फायदेशीर मानले गेले आहे. शुद्ध तुपात वातावरणातील जंतू दूर करण्याची क्षमता असते. अशा तुपाचा जेव्हा अग्नीशी संबंध येतो; त्यावेळी वातावरण एकदम पवित्र होते. प्रदूषण दूर होते. दिवा लावल्याने संपूर्ण घराला त्याचा फायदा होतो.
दिवा लावताना दिव्याची वात कोणत्या दिशेला असावी, याचेही काही नियम सांगण्यात आले आहेत. तेलाचा दिवा आपल्या उजव्या हाताला ठेवावा आणि तुपाचा दिवा आपल्या डाव्या हाताला असायला हवा. धनलाभासाठी दिव्याची वात उत्तर दिशेला ठेवावी. आपल्या घरामध्ये वारंवार कोणी आजारी पडत असल्यास दिव्याची वात पूर्व दिशेला ठेवावी. या दोन्ही दिशा अत्यंत शुभ मानण्यात आल्या आहेत. पश्चिम दिशेला दिव्याची वात असल्यास आपल्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. दक्षिण यमाची दिशा असल्याने दक्षिण दिशेला कधीही दिव्याची वात नसावी, असे सांगितले जाते.
देवासमोर लावलेला दिवा विझला किंवा दिवा लावताना विझला, तर तो अशुभ संकेत मानला जातो. मात्र, धर्मशास्त्रात याला कोणताही आधार नाही. त्यामुळे दिवा विझल्यास घाबरून जाता कामा नये. देवाची आणि दिव्याची क्षमायाचना करून तो पुन्हा प्रज्वलित करावा. मात्र, दिवा ओवाळताना तो चुकून खाली पडला, तर त्यासाठी दीपपतन नावाची शांत करावी लागते. ज्या ठिकाणी दिवा पडला, त्याच ठिकाणी ती शांत करावी, असे सांगितले जाते.

 

ॐ पुरूषोत्तमाय नमः 

वर्षात २४ एकादशी येतात. पण ज्या वर्षी अधिक किंवा पुरूषोत्तम मास येतो त्यावर्षी २६ एकादशी येतात. अधिक श्रावण मासातील शुक्ल पक्षातील एकादशीस कमला एकादशी किंवा पद्मिनी एकादशी म्हणतात. पुरूषोत्तम मासातील पहिली एकादशी म्हणून पुरूषोत्तमा एकादशी म्हणून संबोधतात. अधिक मासातील हि एकादशी स्वयंसिद्ध एकादशी आहे. अधिक मासातील शुक्ल पक्षातील ही एकादशी शनिवार दिनांक २९ जुलै २०२३ ला आहे. पुरूषोत्तम मासात श्री. विष्णूंची जास्तीत जास्त उपासना करतात. ह्या एकादशीचे व्रत करणाऱ्यास संसारीक, भौतिक सुखाची प्राप्ती होते.
कमला एकादशी व्रत केल्याने, सर्व मनोकामना, प्रबळ इच्छा पूर्ण होतात. श्रीविष्णूंची कृपा आणि शुभाशिर्वाद प्राप्त होतात. श्रीविष्णूंसह महालक्ष्मी देवीची कृपादृष्टीही राहते. त्यामुळे श्रीविष्णूंना प्रसन्न करण्यासाठी पुरुषोत्तम एकादशीचे व्रत आवर्जुन आचरावे.

एकादशी प्रारंभ:-
२८ जुलै २०२३ शुक्रवारी
दुपारी २.५२ पासून
एकादशी समाप्ती :-
२९ जुलै २०२३ शनिवार
दुपारी १.०६ पर्यंत

एकादशी आणि ही एकादशी अधिक मासातील, तेव्हा श्री. विष्णूसहस्रनाम स्तोत्राचे अधिकाधिक पठण वा आवर्तने करावीत. पुरूषोत्तम मासात दान करण्यासही अनन्यसाधारण महत्त्व आहे.

कमला / पद्मिनी एकादशी

दोन शुभ योग

यावेळी कमला / पद्मिनी एकादशीला दोन शुभ योग तयार होत आहेत. २९ जुलै रोजी सकाळपासून ब्रह्मयोग सुरू होईल, ज्याची समाप्ती ०९.३४ वाजता होईल. यानंतर इंद्र योग सुरू होईल. ज्येष्ठ नक्षत्र हे सकाळपासून ११.३५ मिनिटांपर्यंत असते, त्यानंतर ते मूल नक्षत्र असते.

पद्मिनी एकादशी व्रताची कथा
कृतवीर्य हा त्रेता युगातील माहिष्मती पुरीचा राजा होता. ते हैहाय नावाच्या राजाचे वंशज होते. कृतवीर्याला 10 बायका होत्या, पण त्यांपैकी कोणालाही मूलबाळ नव्हते. त्यांच्यानंतर माहिष्मती पुरीची सत्ता हाती घेणारा कोणीच नव्हता. राजाला याची काळजी वाटली. त्याने सर्व प्रकारचे उपाय केले पण उपयोग झाला नाही. यानंतर राजा कृतवीर्याने तपश्चर्या करण्याचे ठरवले. त्याच्यासोबत त्याची पत्नी पद्मिनीही जंगलात जाण्यासाठी तयार झाली. राजाने आपला कार्यभार मंत्र्याकडे सोपवला आणि योगींच्या वेशात पत्नी पद्मिनीसह गंधमान पर्वतावर तपश्चर्या करण्यासाठी निघून गेला.

असे म्हणतात की पद्मिनी आणि कृतवीर्य यांनी 10 वर्षे तपश्चर्या केली, तरीही पुत्ररत्न जन्माला आले नाही. दरम्यान, अनुसूयाने पद्मिनीला मलमास सांगितले. ते म्हणाले की मलमास 32 महिन्यांनंतर येतो आणि सर्व महिन्यांमध्ये सर्वात महत्वाचा मानला जातो. शुक्ल पक्षातील एकादशीचे व्रत केल्यास तुमच्या मनोकामना नक्कीच पूर्ण होतील. श्री हरी विष्णू प्रसन्न होऊन तुम्हाला पुत्ररत्नाचा आशिर्वाद नक्कीच देतील.

पद्मिनीने मलमासाच्या शुक्ल पक्षातील एकादशीला नियम आणि नियमांनुसार उपवास केला. यावर प्रसन्न होऊन भगवान विष्णूंनी तिला पुत्रप्राप्तीचे वरदान दिले. त्या आशीर्वादामुळे पद्मिनीच्या घरी एका मुलाचा जन्म झाला, त्याचे नाव कार्तवीर्य ठेवले. पुढे तो एक योद्धा झाला. भगवान श्रीकृष्णाने सांगितले की, जे लोकं मलमासातील पद्मिनी एकादशीच्या व्रताची कथा ऐकतात, त्यांना स्वर्ग प्राप्त होतो.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

 

 

श्री स्वामी समर्थ
काळजी करू नका, स्वामी आपल्या पाठीशी आहे

Exit mobile version