जिवंतिका पूजन
(श्रावणी शुक्रवार व्रत)
जिवंतीका पुजन
shravani shukrvar jivantikapujan mahiti श्रावणी शुक्रवार व जिवंतिका पुजन हे अनेक घराण्याचा कुळाचार आहे. श्रावणातल्या शुक्रवारी कुलदेवीची व लक्ष्मीची अराधना करून सुवासिनींना भोजन व हळदी-कुंकू, फुले, पाने व सुपारीसह दक्षीणा देऊन सत्कार केला जातो. ह्या विधीस “सवाष्ण करणे” म्हणतात. श्रावण महीन्यात चारी शुक्रवारी संध्याकाळी सुवासिनींना हळदी- कुंकवाला बोलवून त्यांना दुध्-साखर चणे-फुटाणे द्यावेत. प्रत्येक शुक्रवारी मुठीचे पुरण घालावे व कोणत्याही एका शुक्रवारी पुरणपोळी करून सवाष्ण जेवावयास घालावी. तिला दक्षीणा द्यावी. श्रावणातल्या चारी शुक्रवारी जिवंतिका पुजा करतात. ही पुजा संततीरक्षणार्थ मानली जाते.
जिवंतीचा कागद श्रावण महिन्याच्या सुरुवातीस जो वार (उदा. मंगळवार, बुधवार, शुक्रवार, शनिवार) येईल त्या दिवशी देव्हार्याजवळ भिंतीवर लावावा.त्याची पुजा आठवड्यातून चार दिवस करावी.
श्रावण शुक्रवारी कुलदेवीची व लक्ष्मीमातेची तसेच जिवंतीची पुजा करावी फुले, आघाडा व दुर्वा ह्यांची एकत्र करून केलेली माळ, हळद्-कुंकू लावलेले २१ मण्यांचे कापसाचे गेजवस्त्र, गंध, हळदि-कुंकू, अक्षता लावून जिवतीची पुजा करावी.
पुरणाचे ५ / ७ / ९ असे दिवे करून लक्ष्मीमातेची व जिवतीची आरती करावी. विड्यांच्या पानांबरोबर सुपारी व फळ ठेवून दुध्-साखरेचा व चणे-फुटाण्याचा नैवेद्य दाखवावा. त्या दिवशी स्वयपाकांत मुख्य म्हणजे पुरण घालतात. बाकी स्वयंपाक वरण्-भात्-तूप, लिंबू, भाजी, पुरण, खीर, चटणी, कोशिंबीर, तळण, वाटली डाळ, आमटी ई. करावा.
देवाला रांगोळी काढून नैवेद्य दाखवावा. सवाष्णीच्या ताटाभोवती रांगोळी काढावी. जेवावयास बसण्यापुर्वी पानापुढे विडा दक्षीणा ठेवून नमस्कार करावा. जेवण झाल्यावर सवाष्णीची खणा-नारळाने ओटी भरावी. जिवंतीची पुजा करून तिला औक्षण करून तिची आरती झाल्यावर घरातील लहान मुलांना पाटावर बसवून त्यांना पण औक्षण करावे.
श्रावण महिन्यातील जिवंतीची कहाणी
एक आटपाट नगर होते. तिथल्या राजाला मूल नव्हते. सर्व सुखे हात जोडून उभी असली तरी त्याचा जीव रमत नव्हता. राणी कष्टी होती. ती सारखी आसवे ढाळी. माझी कूस उजव म्हणून देवाला विनवी. पण तिची व्यथा संपली नाही. मग तिने एका सुइणीला बोलावले. म्हणाली , ‘ मला कोणाचे तरी नाळ-वारीचे मूल आणून दे. तुला सोने-नाणे देईन. ‘ सुइण कबूल झाली. राणीने गरोदरपणाचे सोंग केेले. नऊ मास पूर्ण होत आले असता गावातील एक ब्राह्माणी प्रसूत होऊन तिला मुलगा झाला. सुइणीने तो नाळ-वारेसहीत राणीच्या कुशीत नेऊन ठेवला आणि ब्राह्माणीला म्हणाली की बये, तुला वरवंटा निपजला. इथे राजवाड्यात आनंदोत्सव साजरा झाला. राजाला जगण्यात अर्थ गवसला. राणीच्या कुशीत बाळाचा ट्यॅहा फुटला.
ब्राह्मणी मुलाच्या आशेने झुरू लागली. श्रावण महिन्यात दर शुक्रवारी जिवतीची पूजा करू लागली. ‘ जिथे माझा बाळ असेल तिथे तो खुशाल असो ‘ म्हणत सर्व दिशांना तांदूळ उडवू लागली. ते तांदूळ राजवाड्यात राजपुत्राच्या अंगावर पडू लागले. ब्राह्माणीने हिरवे लुगडे , हिरव्या बांगड्या र्वज्य केेल्या. ती कारलीच्या मांडवाखालून जाईना. तांदुळाचे धुवण ओलांडीना. मुलगा मोठा झाला. राज्याचा राजा झाला. एक दिवस ब्राह्माणी त्याच्या नजरेस पडली. तिचे देखणे रूप पाहून त्याच्या मनात पाप उत्पन्न झाले. तिच्या दारातील वासराच्या शेपटीवर त्याचा पाय पडला. गाय वासराला म्हणाली , ‘ जो आपल्या आईची अभिलाषा धरायला कचरत नाही, तो तुझ्या शेपटीवर सहज पाय देईल. ‘ राजाला पश्चाताप झाला.
पुढे तीर्थयात्रा करून त्याने सर्व प्रजेला जेवायला बोलावले. ब्राह्माणीही तेथे आली. राजा पंक्तीत तूप वाढू लागला. तिच्या पानापाशी तो येताच तिला पान्हा फुटला आणि त्याची धार राजाच्या तोंडात उडाली. राजाला राग आला. पण त्याची राणीआई त्याला म्हणाली, ‘बाळ, हीच तुझी खरी आई. ‘ राजा आईच्या पाया पडला. आई-वडिलांना वाडा बांधून दिला. जिवती त्या सर्वांवर प्रसन्न झाली.
अशी ही जिवतीची कहाणी.
आजही श्रावण आला, की पहिल्या शुक्रवारी भिंतीवर केशराने अथवा गंधाने जिवतीचे चित्र काढतात.घराघरात भिंतीवर मुलालेकरांच्या गराड्यात रमलेल्या जिवतीचा कागद लावतात. पूजा करतात. तेरड्या- आघाड्याची पानेफुले आणि दुर्वांची माळ करून देवीला घालतात. कणकेचे पाच दिवे करून देवीला ओवाळतात. ‘ माझे बाळ जिथे आहे त्या दिशेला मी अक्षता टाकतेय, हे जिवतीआई, तू त्याचे रक्षण कर. ‘ अशी मनोमन प्रार्थना करतात. पुरणावरणाच्या जेवणाने पुजेची सांगता करतात.
shravani shukrvar jivantikapujan mahiti
काळ बदललाय. जगणे बदलले. रोजचे संदर्भ बदलले. तरी आईची माया तशीच राहिली. ही माया आटत नाही तोवर जिवती प्रसन्नच राहणार. ती तशीच राहो, ही तुम्हाआम्हा सर्वांची प्रार्थना ती सुफळ संपूर्ण होवो.
श्री जिवतीची आरती
जयदेवी जयदेवी जय जिवती जननी ।
सुखी ठेवी संतति विनंति तव चरणी ॥ धृ. ॥
श्रावण येतांची आणूं प्रतिमा ।
गृहांत स्थापूनी करुं पूजना ।
आघाडा दूर्वा माळा वाहूं या ।
अक्षता घेऊनी कहाणी सांगू या. ॥ १ ॥
जयदेवी जयदेवी जय जिवती जननी ।
सुखी ठेवी संतति विनंती तव चरणी ॥ धृ.॥
पुरणपोळीचा नैवेद्द दावू ।
सुवासिनींना भोजन देऊ ।
चणे हळदिकुंकू दूधही देऊं ।
जमुनी आनंदे आरती गाऊं .॥ २ ॥
जयदेवी जयदेवी जय जिवती जननी ।
सुखी ठेवी संतति विनंतितव चरणी ॥ धृ. ॥
सटवीची बाधा होई बाळांना ।
सोडवीसी त्यांतूनी तूंची तयांना ।
यासाठी तुजला करिती प्रार्थना ।
पूर्ण ही करी मनोकामना .॥ ३ ॥
जयदेवी जयदेवी जय जिवती जननी ।
सुखी ठेवी संतति विनंति तव चरणी ॥ धृ. ॥
तुझिया कृपेने सौख्य नांदू दे ।वंशाचा वेल वाढूं दे ।
सेवा हे व्रत नित्य घडूं दे ।
मनीचे हेतू पूर्ण होऊं दे .॥ ४ ॥
जयदेवी जयदेवी जय जिवती जननी ।
सुखी ठेवी संतति विनंति तव चरणी ॥ धृ. ॥
जिवंतिका पुजन दिवस
shravani shukrvar jivantikapujan mahiti
महालक्ष्मी आणि जिवती पूजनानिमित्त श्रावण शुक्रवारी जेऊ घाला सवाष्ण.लक्ष्मी पूजेच्या निमित्ताने सवाष्ण जेवू घालण्याचा आपल्याकडे प्रघात आहे, अशातच १८ ऑगस्ट रोजी श्रावणातला पहिला शुक्रवार आहे
यंदा १७ ऑगस्ट रोजी श्रावण सुरू झाला आणि बृहस्पती पूजनानंतर जिवतीला पुजण्याचा आणि महालक्ष्मी स्थापन करण्याचा दिवस आला. तो दिवस अर्थात श्रावण शुक्रवार. ही उपासना असते लक्ष्मीची. ती सोनपावलांनी आपल्या घरात यावी म्हणून सवाष्ण जेवू घालण्याचा प्रघात आहे. त्यामागील कारण काय तेही पाहुया.
लक्ष्मी प्रसन्न व्हावी असे वाटत असेल तर गृहलक्ष्मी तृप्त असायला हवी, हा संसाराचा मूलमंत्र आहे. मात्र कामाच्या धबडग्यात गुंतून गेलेली ‘ती’ ना स्वतःकडे लक्ष देत ना कोणाचे तिच्याकडे लक्ष जात. अलीकडे आपण ‘जागतिक महिला दिन’ साजरा करायला लागलो, मात्र भारतीय संस्कृतीने घराघरातल्या ‘ती’ची आठवण ठेवत व्रत वैकल्याच्या निमित्ताने पूर्वापार तिचा सन्मान केला आहे. कसा ते पाहू!
हॉटेलमध्ये जेवायला जाणे आताच्या काळात नाविन्यपूर्ण राहिले नाही. उठसूट जंक फूड खाणारे लोक क्वचितच घरी जेवत असतील. मात्र रोज संसार, नोकरी, मुलांच्या शाळा, अभ्यास, नवऱ्याचा डबा, घरच्यांचे जेवण, नाश्ता यात गुंतलेली गृहिणी नवऱ्याने ‘बाहेर जेवायला जाऊया का?’विचारल्यावर आनंदून जाते. कारण सकाळ, दुपार, संध्याकाळ ‘रांधा वाढा उष्टी काढा’ करून ती दमून जाते, कंटाळून जाते. आजही ७० टक्के घरात हेच चित्र आपल्याला दिसेल. ‘द ग्रेट इंडियन किचन’ या मल्याळम चित्रपटातून या गोष्टीची जाणीव करून दिली आहे. त्यामुळे हॉटेलमध्ये जाऊन आयते गरमागरम जेवणे आणि त्यानंतर पसारा आवरावा न लागणे यातच तिला कोण एक आनंद असतो!
मात्र पूर्वी हॉटेलमध्ये जेवणे असभ्यपणाचे लक्षण मानले जाई. घरातले पुरुष हॉटेलात जात नसत तर स्त्रियांचे जाणे दूरच सगळ्यांना गरमागरम जेवण वाढणारी, दुसऱ्यांच्या आवडी निवडी जपणारी ती आयते जेवण मिळण्यापासून वंचित राही. अशा अन्नपूर्णेलाही पहिल्या पंगतीचा मान मिळावा म्हणून धर्मशास्त्राने सण उत्सवाच्या निमित्ताने सवाष्ण जेवू घालण्याची प्रथा सुरु केली असावी. सण उत्सवाच्या निमित्ताने आप्तेष्टांच्या घरी बोलावल्यावर जेवायला जायचे, पाटावर आयते बसायचे, यथेच्च जेवायचे आणि तृप्ततेची ढेकर द्यायची, हा आनंद कोणत्याही संसारी स्त्रीसाठी शब्दातीत स्वर्ग असतो. तसेही रोज रोज आपल्याच हातचे जेवून तिला कंटाळा येतो, म्हणून या निमित्ताने झालेली चवबदल तिला रुचते! हॉटेलमध्ये एखादी पोळी, रोटी, नान एक्ट्रा घेतली तरी तिचे वरचे पैसे मोजावे लागतात, याउलट जेवायला मानाने बोलावल्यावर अगत्याने, प्रेमाने, आपुलकीने पोळीचा, भाताचा, गोडाचा आग्रह केला जातो. त्या पाहुणचाराने ती सुखावते आणि मनापासून आशीर्वाद देते. या सदिच्छा ज्याला आजच्या काळात आपण ‘पॉझिटिव्ह वाइब्स” म्हणतो, त्या संबंधित वास्तूला लाभदायी ठरतात. तृप्त झालेला आत्माच या सदिच्छा देऊ शकतो. म्हणून आपल्या संस्कृतीत अन्नदानाला महत्त्व दिले आहे. भुकेल्या माणसाला अन्न आणि पैसे यातून काय निवडणार विचारले, तर तो अन्न निवडेल. कारण पैसे कधीही कमवता येतात, मात्र दोन वेळेची भूक शमवता येत नाही.
गृहिणीला स्वगृही जेवण मिळतेच. पण अशा पद्धतीने केलेला तिचा आदरसत्कार तिला नवीन ऊर्जा, उत्साह आणि प्रसन्नता देतो. म्हणून सण उत्सवाला तिला जेवू घालणे हे तिचे माहेरपण करण्यासारखेच असते.
धर्मशास्त्राने प्रत्येक समाज घटकाचा दूरदृष्टीने केलेला विचार पाहता आपल्या संस्कृतीबद्दल असलेला अभिमान दुणावतो. म्हणून आपणही ही उद्दात्त संस्कृती पुढच्या पिढीकडे हस्तांतरित केली पाहिजे. आणि आदर्श जीवनाचा वस्तुपाठ घालून दिला पाहिजे. तर मग यंदा जिवतीच्या आणि महालक्ष्मीच्या पूजेनिमित्त पुरणा-वरणाचा स्वयंपाक जेवायला कोणत्या सखीला आमंत्रित करताय?.
देवीची स्त्रोत्र आणि त्याची फलश्रुतीची
shravani shukrvar jivantikapujan mahiti
दुर्गाष्टोत्तरनामशतनामस्त्रोत्र या स्त्रोत्राचे या केल्यास आपल्या दैनंदिन जीवनात सकारात्मक वाढीस लागते.त्यामुळे करत असलेल्या कार्यात यश मिळतेच तसेच धनधान्य, पुत्रपौत्र व मोक्ष मिळतो.
देविकवच
या कवचाच्या पढणाने आपल्या आयुष्यात येणारे संकटाचा सामना करण्यास मदत होते व त्या संकटाला मात करून आपले जीवन सुखकर होऊ शकते.
देव्यथर्वशीर्ष.
याच्या पढणाने पापनाश, संकटातून मुक्ती होते. तसेच सभोवती अमावस्येला या स्त्रोत्रचे 108 पाठ केल्यास आपल्या आयुष्यात असलेले दीर्घकाळ आजारपणातून मुक्तता होऊन तब्येतीत सुधारणा होते.
अर्गला स्त्रोत्र.
आपण प्रगती करत असताना दुसर्या कडून सतत अडथळा निर्माण होत असतो जर या स्त्रोत्राचे नियमित पाठ केल्यास आपल्या शत्रुचा निपात होऊन आपली प्रगती होत जाते.तसेच यश, किर्ती सुध्दा मिळतेच. आपल्याला अनुरूप जोडीदार मिळण्यासाठी याचे नियमित पाठ केल्यास चांगला आयुष्याचा जोडीदार मिळतो.
कुज्जिकास्त्रोत्र.
संपुर्ण दुर्गासप्तशती पाठाचा सार या स्त्रोत्रात आहे. देवाचा आर्शीवाद, कृपा, व्यवसायातील अडचणी या सारख्या अनेक अडचणीवर मात करण्यासाठी याचे पाठ करावेत. संपुर्ण सप्तशती पाठाचे फळ या स्त्रोत्रात आहे.
श्रीकनकधारास्त्रोत्र.
या स्त्रोत्रचे नियमित पाठ केल्यास आपल्या भाग्यात येणारे अडथळे दुर होऊन आपला भाग्योदय होऊन आपल्या कार्यात यश मिळते.
श्रीमंगल चण्डिकास्त्रोत्र.
या स्त्रोत्राच्या पढणाने कर्जमुक्तीसाठी मार्ग मिळतात. घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहून प्रगती होते. घरातील कलह कमी होऊन कौटुंबिक सौख्यात वाट होते. विवाहातील अडथळे होतात. या स्त्रोत्रचे घरामध्ये संकल्प करुन पाठ केल्यास घरातील वास्तु दोष दुर होऊन आपली प्रगती होत जाते.
श्री स्वामी समर्थ
काळजी करू नका स्वामी आपल्या पाठीशी आहे